Urbanisation

Urbanisation

शहरीकरण-नागरीकरण

शहरीकरण चांगले की वाईट असे विचारल्यावर कोणत्याही सभेत बहुतेक सगळे लोक "वाईट' असे मत देतील. पण स्थलांतर करताना मात्र खेड्याकडून शहराकडे, शहराकडून अधिक चांगल्या शहराकडे हीच दिशा असते. आर्थिक विकास, स्वातंत्र्य, विकास या सर्व आकान्क्षा पूर्ण होण्यासाठी शहर-नगर ही महत्त्वाची व कळीची गोष्ट आहे. खेडी व शहरे परस्परावलंबी असतात, एकवेळ पूर्ण शहरी देश असणे शक्य आहे, पण केवळ खेड्यांचा देश अशी कल्पना करणेही अशक्य आहे. वस्तुत: सर्व पाश्चिमात्य देश (युरोप, अमेरिका, कॅनडा, दक्षिण अमेरिकन देश, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) जपान-तैवान सिंगापूर, हॉंगकॉंग अशी प्रगत आशियन राष्ट्रे शहरीकरणातून प्रगत झाली आहेत. शिवाय ती शेतीही करतात. शेतमाल निर्यात करतात, स्थलांतरिताना सामावून घेतात आणि जागतिक अर्थकारणाचा "हब' बनतात.

याउलट खेडीप्रधान देश मागास आहेत, गरीब आहेत, समस्या प्रधान आहेत. म.गांधीनी खेड्यांचा नारा दिला, आंबेडकरांनी दलितांन शहरांकडे चला असा नारा दिला. आज भारतही शहरीकरणाच्या अपरिहार्य खरे तर स्वागतार्ह टप्प्यावर आलेला आहे. देशाच्या आर्थिक विकासाचे प्रारूप शहरीकरणाशिवाय कल्पनेतही शक्य नाही. (भारत जगात अग्रेसर होता तेव्हा 20-24% नागरी होता असे एक मत आहे)

शहरीकरण-नागरीकरण हवे, ते योग्य हवे, सुंदर हवे, झोपडपट्‌ट्यांचे नको, नागरी स्वातंत्र्य जपणारे पाहिजे, मुक्त अर्थव्यवस्थेतून उमलणारे हवे हा आग्रह हवा. बकाल, हिंसक प्रदूषण, वाहतूक कोंडी, घाणेरडे शहर नको हीच अपेक्षा आहे. (सध्याच्या परिस्थितीत बिल्डर देखील अपघाती मरणाची शिकार होताहेत, इतरांचे काय सांगावे). स्मार्ट शहर असावे अशी सरकारी घोषणाच आहे.

 

खेड्यांचे शहरीकरण ही एक संथ प्रक्रिया असल्याने, तोपर्यंत खेड्यांची सुधारणा करणे, ती लहान-लहान आधुनिक नगरे होतील यासाठी धोरण असायलाच हवे. मात्र खेड्यांचे नागरीकरण व आधुनिकीकरण करणे ही ही एक व्यवस्थात्मक प्रक्रिया आहे. प्रशासन, गुंतवणूक, तंत्रज्ञान, कायदा व जमीन विषयक कायदे या सगळ्याच गोष्टी त्यात गुंतलेल्या आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्था ही बिकट परिस्थितीत असताना नुसता खेड्यांचा चांगला विकास होईल ही कल्पना वास्तवात येऊ शकत नाही.

शहर हे माणूसकेंद्री असायला हवे, आणि मोटरकेंद्री नको. माणसांना चालण्यासाठी, बसण्यासाठी, रेंगाळण्यासाठी, कामासाठी, खेळण्यासाठी, करमणुकीसाठी शहर अनुकूल हवे त्यासाठी त्याची रचना, विस्तार, प्रमाण सुबद्ध हवे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. शहरांमध्ये अधिकाधिक लोक जागोजागी असले व दिसले पाहिजते. लोक केवळ बंद मोटारी व बंद इमारतीत असल्यास असे शहर जिवंत व चांगले म्हणता येत नाही, चांगल्या  शहरात लोकांना पुरेशा नागरी सोयी मिळणे, सुरक्षितता असणे, याचबरोबर सौंदर्य व आनंद अनुभवण्यासाठी जाणीवपूर्वक नियोजन व रचना हव्यात. अनेक शहरांना हवामान व वातावरणानुसार घडवावे लागते, सब घोडे बारा टक्के असे असून चालत नाही. फार मोठी शहरे असली तर लोकांना वाहने वापरावीच लागतात व अंतरे चालणे अवघड होते. यासाठी नियोजनात पुरेशी काळजी घ्यावी लागते. त्यातल्या त्यात सायकली किंवा स्केटबोर्ड लावून लोक इकडून तिकडे जाऊ शकतात पण त्यासाठी सुरक्षित रस्ते व पदपथ असायला हवेत. युरोपात या दृष्टीने अनेक शहरे बदलली आहेत आणि बदलत आहेत. या भिंगातून पाहिल्यास केवळ फ्लायओव्हर आणि मोटर गाड्यांच्या नद्या वाहणे म्हणजे शहर नव्हे. एखादे शहर विमानातून कसे दिसते यापेक्षा जमिनीवरून कसे दिसते हे अंतिमत: महत्त्वाचे ठरते आणि नवी स्मार्ट शहरे घडवताना हा मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा आहे. अनेक सुंदर शहरांमध्ये निवासी व बाजारपेठांतल्या रस्त्यांवर चालण्यासाठी अल्हाददायक रचना असते. रस्त्याची कड मृदू (घरे, झाडे, पारदर्शक इमारती) आहे की कठीण (बांधीव व अपारदर्शक) यावर बऱ्याच गोष्टी ठरतात. थोडक्यात चांगल्या शहरामध्ये नागरिकांचा उत्साहपूर्ण वावर असणे यामुळेच शहर खरे जिवंत वाटते हे स्पष्ट आहे. माणसे शहरांना घडवतात आणि शहरेदेखील माणसाना घडवतात

लिबरल दृष्टिकोनातून खालील सूत्रे मांडता येतील.

  1. ग्रामीण भागात काही सोयींची गावे (दळणवळण व संरचनेसाठी) अधिक विकसित होतील, आजूबाजूची अर्थव्यवस्था त्यात सहभागी होऊन ही नवी केंद्रे व त्याचा परीघ वाढत जाणे.
  2. लहान नगरांचाही विकास होणे, नव्या अर्थव्यवस्थेच्या प्रवाहात येणे, मॉडेल शहरांची नियमावली, विकासप्रक्रिया व पर्याय तयार होणे यासाठी आवश्यक ती गुंतवणूक होत राहणे.
  3. जुन्या शहरांचा कायापालट होण्यासाठी अर्थव्यवस्था उद्योग, कायदे, निवासी विभाग, संरचना व सोयी.

Urbanisation

 

userdemo

Leave a Reply

Close